
हुपरी प्रतिनिधी – हुपरी ( कोल्हापूर ) येथे कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली .सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष यशवंतदादा पाटील होते.
येथील हुतात्मा स्मारक कार्यालयात झालेल्या या सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व संघटनेचे खजिनदार नानासाहेब गाठ, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू मुंतजर मुजावर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नगरसेवकपदी निवडून आलेले रामानंद गोसावी ( पन्हाळा ), योगेश वराळे ( पन्हाळा ), रोहित नांद्रेकर(जयसिंगपूर )यांच्यासह कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या खजिनदारपदी निवड झालेले सुनील कल्याणी ( हुपरी ) तसेच संग्राम तोडकर यांची स्वामी विवेकानंद संस्थेत प्राध्यापक पदी निवड झाल्याबद्दल या सर्वांचा सत्कार करण्यात आला .
सभेत अहवाल वाचन सचिव प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले . सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यास मंजूरी देण्यात आली . सन २०२५ ते २०२६ या आर्थिक वर्षातील जमाखर्चासही मंजूरी देण्यात आली . सभेत ज्या संलग्न क्रीडा संघटनांनी व सामान्य सभासदांनी वार्षिक संलग्नता फी किंवा सभासदांनी वार्षिक वर्गणी भरलेली नाही . त्यांनी तातडीने फी भरण्यावर सर्वानुमते मंजूरी देण्यात आली . तसेच २०२६ – २७ मध्ये होणाऱ्या १४, १६ , १८ व २१ वयोगटातील जिल्हा निवड चाचणी स्पर्धेची ठिकाणे ठरवण्यात आली . तसेच सिनीयर गटाची अजिंक्यपद स्पर्धा आक्टोंबर मध्ये घेण्यावर सभेत एकमत झाले . त्याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व संघटनेचे खजिनदार नानासाहेब गाठ यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या पदावर सुनिल कल्याणी ( हुपरी ) यांची निवड सभेने सर्वानुमते केली . आयत्या वेळच्या विषयामध्ये खेळाडूंच्या समस्याबाबत विचार विमर्श करण्यात आला .
राष्ट्रीय पंच रामानंद गोसावी यांनी संघटनेच्या स्तरावर शालेय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 14 वर्षातील खेळाडूंचा कोचिंग कॅम्प घ्यावा . तसेच महेश शेडबाळे यांनी चौथी ते सातवी या वर्गातील हॉलीबॉलच्या जिल्हास्तरीय स्पर्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याची मान्य केले .
याबरोबरच जिल्ह्यात व्हॉलीबॉलच्या खेळाचा प्रसार वाढवण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला .
यावेळी चर्चेत महेश शेडबाळे, महादेव कानकेकर, मारुती काशीद , नितीन दिंडे यांनी सहभाग घेतला . यावेळी उपाध्यक्ष बी डी सावगावे, महादेव कानकेकर , जॉईंट सेक्रेटरी प्रा. सुनिल चव्हाण ,प्रा. शिवाजीराव चोरगे ,अरविंद भोसले , पराग जोशी , बाळसिंग मिसाळ ,सुभाष कागले यांच्यासह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते . यावेळी उपाध्यक्ष महादेव कानकेकर यांनी आभार मानले .












