Edition

शिराळ्यात सलोखा निर्धार परिषद नियोजनासाठी व्यापक बैठक; क्रांतीदिनी परिषद, तालुकाभर सद्भावना ऐक्य यात्रा काढण्याचा निर्धार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – आगामी ९ ऑगस्ट २०२६ (क्रांतीदिन) रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या सलोखा निर्धार परिषदेच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज शिराळा येथील अंबामाता मंदिरात विविध राजकीय पक्ष, समविचारी सामाजिक संघटना आणि नागरिकांची व्यापक बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत सामाजिक सलोखा, बंधुभाव, संविधानिक मूल्ये आणि शिराळा तालुक्याचा स्वातंत्र्य चळवळ व सामाजिक परिवर्तनाचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी श्री. सुनील तांदळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीची प्रस्तावना मांडली. सलोखा निर्धार परिषदेचे प्रमुख निमंत्रक डॉ. भारत पाटणकर यांनी तयार केलेल्या आवाहनपत्राचे वाचन श्री. बाळासाहेब नायकवडी यांनी केले. परिषदेचे सहनिमंत्रक कॉम्रेड धनाजी गुरव यांनी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सलोखा निर्धार परिषद आयोजित करण्याबरोबरच त्यापूर्वी संपूर्ण शिराळा तालुक्यात सद्भावना ऐक्य यात्रा काढण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उपस्थितांनी एकमताने पाठिंबा दिला.

यावेळी शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) तसेच युवा नेते मा. रणधीर नाईक (पापा) उपस्थित होते. त्यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

बैठकीत विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसच्या वतीने रवी पाटील यांनी तालुकाभर सद्भावना ऐक्य यात्रेचे नियोजन करण्यासंदर्भातील ठराव मांडला. वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रा. सम्राट शिंदे यांनी सद्भावना यात्रेचे विभागनिहाय नियोजन करून प्रत्येक भागात व्यापक जनसहभाग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विजयकुमार जोखे, बहुजन विचारवादी रणधीर कांबळे, प्रतापराव पाटील, संभाजी ब्रिगेडचे उमेश शेवाळे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेत सलोखा परिषद यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. परिषदेच्या आयोजनासाठी लोकसहभागातून निधी संकलन करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यावेळी अमित गायकवाड, विजय महाडिक, करमाळ्याचे सरपंच सचिन पाटील, अमर पाटील, सुनील कवठेकर, विश्वासचे संचालक संदीप तडाके, रणजित चव्हाण, उत्तम डांगे, अजित हवालदार, नगरसेविका सीमा शिंदे, दस्तगीर मोमीन, गौस मुजावर, राम पाटील, अक्षय गायकवाड, सर्जेराव कोकाटे यांच्यासह विविध पक्ष, संघटना व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी डॉ. भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन करत सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्ये, संविधान आणि शिराळा तालुक्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!