मुंबई, प्रतिनिधी : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० जून २०२६ रोजी मुंबईतील विधानभवनावर विराट महामोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात राज्यभरातून लाखो भीमसैनिक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनेही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.
मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेला मोर्चा विधानभवनाकडे रवाना झाला. भर पावसात निघालेल्या या मोर्चात सहभागी आंदोलकांनी “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” आणि “जय भीम” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
मोर्चादरम्यान आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता तसेच संबंधित समाजघटकांची अद्ययावत जनगणना नसताना उपवर्गीकरणाचा निर्णय कसा घेतला जाणार, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. उपवर्गीकरणामुळे सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला धक्का बसू शकतो, अशी भूमिकाही व्यक्त करण्यात आली.
आंदोलकांनी राज्य सरकारने उपवर्गीकरण नेमके कोणत्या क्षेत्रात—शैक्षणिक, आर्थिक, नोकरी, राजकीय प्रतिनिधित्व किंवा इतर कोणत्या बाबतीत—राबविण्याचा विचार आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली. आरक्षण हे गरिबी हटाव योजना नसून सर्वांना समान संधी देणारी घटनात्मक व्यवस्था असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याचे आकाश दादा शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भीमसैनिक या मोर्चात सहभागी झाले. आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.












