कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मांढरे (ता. करवीर) येथे छापा टाकून अवैधरित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ६३ हजार ८४० रुपयांचा गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मांढरे येथे सर्जेराव जगताप हा बिगरपरवाना गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले.
गुन्हे शोध पथकाने माहितीची खातरजमा केल्यानंतर विजय मारुती पोवार यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ काही काळ पाळत ठेवली. यावेळी गोठ्याबाहेर खाकी रंगाच्या दारूच्या बॉक्ससह बसलेल्या संशयित व्यक्तीकडे नागरिकांची ये-जा सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून सर्जेराव सखाराम जगताप (वय ४०, रा. मांढरे, ता. करवीर) याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे बॉक्स असा एकूण ६३,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत सर्जेराव जगताप याने विजय मारुती पोवार (वय ३९, रा. माळवाडी, मांढरे, ता. करवीर) याच्या साथीने अवैधरित्या दारूची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ विजय तळसकर करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील आणि प्रकाश कांबळे यांनी केली.











