Edition

महिलांनी आर्थिक सक्षमते बरोबरच शारीरिक सक्षम व्हावे – सौ. वेदांतिका धैर्यशील माने.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा / प्रतिनिधी

महिलांनी आर्थिक सक्षमते बरोबरच शारीरिक सक्षम होऊन आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधार बनण्याची गरज असल्याचे मत सौ. वेदांतिका धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.

चरण ता. शिराळा येथे झालेल्या शिवसेना महिला सबलीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. महिला सबलीकरण कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. अनिता माळगे, वैशाली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सौ. वेदांतिका माने म्हणाल्या, “महिला सक्षमीकरण”. कोणत्याही राष्ट्राची प्रगती त्या राष्ट्रातील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते. ज्या समाजात महिलांचा सन्मान होतो, त्या समाजात विकास, संस्कार आणि समृद्धी आपोआप येते. आज शासनाच्या अनेक योजना महिलांसाठी उपलब्ध आहेत. स्वयंरोजगार, बचत गट, कौशल्य विकास, उद्योजकता, आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक सहाय्य अशा अनेक माध्यमांतून महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या योजनांची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचणेही तितकेच आवश्यक आहे.

आज महिलांनी शेती, उद्योग, लघुउद्योग, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, बँकिंग, पोलिस दल, सैन्य, अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे चित्र आणखी व्यापक व्हावे, यासाठी समाजातील प्रत्येकाने महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. महिला सुरक्षित असतील तर समाज सुरक्षित राहील. म्हणून महिलांवरील अन्याय, अत्याचार, बालविवाह, हुंडा, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता याविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.

या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील माने दादा यांच्या मार्गदर्शनाने चांदोली पर्यटनासोबतच आपला हा ग्रामीण भाग असलेला शिराळा, शाहूवाडी तालुका विकासाच्या प्रवाहामध्ये यावा म्हणून आपल्या डोंगरी आणि दुर्गम भागातील अनेक वनाऔषधी वनस्पतींचा सध्या अभ्यास सुरू असून लवकरच या वनौषधी विविध आजारावरती आयुर्वेदिक औषध म्हणून बाजारात उपलब्ध होतील. याचबरोबर आपल्या भागातील रानमेवा वनामृत या नावाखाली आपण लोकल टू ग्लोबल करणार आहोत. यासाठी आपल्यासारख्या महिला भगिनींचा यामध्ये सहभाग आवश्यक आहे. आपल्या या शिराळा पश्चिम भागामध्ये पर्यटनाला चालना देण्यासारखे अनेक विषय आहेत. याचा बारकाईने विचार करून महिलांनी त्यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. महिला बचत गट असतील, फार्मर संस्था स्थापन करणे, इथे येणाऱ्या पर्यटकांना होम स्टे सारख्या गोष्टी उपलब्ध करुन देणे असेल यातून आपल्याला हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकसभेतील आपले प्रतिनिधी म्हणून खासदार धैर्यशील माने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा आपल्या महिला भगिनींना फायदा होऊ शकतो याचा देखील विचार गावपातळीवरती होणे गरजेचे आहे.

प्रारंभी दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आयोजक सौ. पूजा संजय नायकवडी यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित महिलांना चित्रफितीद्वारे विविध उद्योग व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजक संजय नायकवडी, महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ. सारिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कुसळेवाडी सरपंच कु. कोमल मस्कर, श्रीमती शैलजा जाधव, यांच्यासह खिरवडे, काळुंद्रे, चरण, आरळा या परिसरातील महिला उपस्थित होत्या.

फोटो ओळ – चरण ता. शिराळा येथे झालेल्या शिवसेना महिला सबलीकरण कार्यशाळेत बोलताना सौ. वेदांतिका माने. शेजारी अन्य महिला मान्यवर.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!