
जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : वाशिम जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय फेरबदलांतर्गत पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी २५ जून २०२६ रोजी शिरपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. शिरपूर पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच महिला पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने परिसरातील नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यापूर्वी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक केशव वाघ यांची पदोन्नती होऊन त्यांची पोलीस उपअधीक्षक या पदावर पोलीस मुख्यालय, वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी योगिता भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
योगिता भारद्वाज यांनी यापूर्वी वाशिम, संभाजीनगर आणि बुलढाणा येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे हे आपले प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. गुंडागर्दी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांची दैनिक समीकरणचे जिल्हा प्रतिनिधी संतोष भालेराव व महाराष्ट्र सुपरफास्ट मराठी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी किशन काळे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढते अवैध धंदे, गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी अवैध व्यवसाय, गुन्हेगारी व समाजकंटकांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ शिरपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.











