Edition

राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार’ प्रा. (डॉ.) शिवाजीराव कांबळे यांना जाहीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाई, प्रतिनिधी : दि.१०-६-२०२६
शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत किसन वीर महाविद्यालय, वाई येथील प्रा. (डॉ.) शिवाजी पांडुरंग कांबळे यांची सन २०२६ च्या राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार’ यासाठी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शाहू छत्रपती फाउंडेशन या संस्थेतर्फे ही घोषणा करण्यात आली असून, डॉ. कांबळे यांच्या निवडीमुळे शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतावादी, पुरोगामी आणि लोककल्याणकारी विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने शाहू छत्रपती फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा पुरस्कार निवड समितीने डॉ. कांबळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले प्रभावी नेतृत्व, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, सामाजिक प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता तसेच वैचारिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान यांची दखल घेत त्यांची निवड केली आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जॉर्ज कुश आणि सचिव जावेद मुल्ला यांनी पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे या निवडीची माहिती देण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून समाजहितासाठी विविध क्षेत्रांत सातत्याने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार डॉ. कांबळे यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन (मिनी सभागृह), दुसरा चौक येथे संपन्न होणार आहे. राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समारंभात पुरस्कारार्थींना मानपत्र, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पारंपरिक कोल्हापुरी फेटा प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभिनव उपक्रम राबविले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक जाणीवा विकसित करणारे कार्यक्रम, तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य यामुळे त्यांनी स्वतंत्र आणि आदर्शवत अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून या पुरस्काराकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
डॉ. कांबळे यांच्या निवडीबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे सचिव, संचालक मंडळ, किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच शिक्षण, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले असून; वाई परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही या निवडीबद्दल समाधान आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.
डॉ. कांबळे यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे केवळ त्यांच्या कार्याचा गौरव झाला नसून, किसन वीर महाविद्यालय आणि जनता शिक्षण संस्थेच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!