विटा : प्रतिनिधी
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी आणि ड्रोन मोजणीसाठी खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माऊली, भाग्यनगर परिसरात पोलीस प्रशासनाने काल मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या हुकूमशाही कारवाईच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज उपविभागीय अधिकारी (SDO) व तहसीलदार कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो बाधित शेतकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काल रात्री २ वाजल्यापासूनच नागेवाडी परिसरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करून सुप्तावस्थेत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरात पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर मोजणीस विरोध करणाऱ्या महिलांशी अत्यंत असभ्य व उर्मट वर्तन करण्यात आले. लोकशाही मार्गाने आपल्या हक्काची सुपीक जमीन वाचवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देणाऱ्या या पोलीस यंत्रणेचा राजू शेट्टी यांनी ‘खाकी वर्दीतील दरोडेखोर आणि जनरल डायरची औलाद’ अशा कडक शब्दांत धिक्कार केला आहे.
शासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बळावर नागेवाडी येथे ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. या संघर्षादरम्यान हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी व संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या अभूतपूर्व संघर्षामुळे प्रशासनाला अखेर ड्रोन मोजणी तात्काळ थांबवून माघार घ्यावी लागली.
प्रांत कार्यालयासमोर झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांना प्रांतांना जाब विचारत शेतकरी प्रकल्पास जमिनीच देणार नसतील तर जोर जबरदस्तीने संपादन करू नये आणि शासनास सदर भुसंपादनास विरोध असल्याचा अहवाल कळविण्याच्या सुचना दिल्या. त्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित होणार आहेत त्या शेतकऱ्यांना पिक कर्ज किंवा इतर कर्जे नाकारण्यात येवू नये अन्यथा कार्यालयातील खुर्च्या बाहेर काढू असा सज्जड इशारा दिला.
यावेळी बोलताना पुढे राजू शेट्टी म्हणाले, “आमचा विकासाला विरोध नाही, मात्र केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि ५० हजार कोटींच्या भ्रष्टाचारासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ओरबाडल्या जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. पोलिसांच्या जोरावर रात्रीच्या अंधारात माता-भगिनींवर हात टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी व सरकारने लक्षात ठेवावे, आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही गरजेचा नसलेला शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.
यावेळी ॲड. दिपक लाड , जिल्हाध्यक्ष संजय बेले , संदीप राजोबा , विश्वास कोळी , प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल, विपुल पाटील, तहसीलदार योगेश टोणपे तसेच खानापूर व विटा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 











