Edition

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई : राज्यातील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून जलसाठे वाढविण्याच्या उद्देशाने यापुढे नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक पुलासोबत पूलवजा बंधारा उभारून नदी-नाल्यांमध्ये किमान एक मीटर पाणी अडविणे बंधनकारक करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील पीक-पाणी परिस्थिती, जलसाठे, पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासह दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले.

जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या तलावांमधील गाळ रस्ते आणि महामार्गांच्या बांधकामासाठी वापरण्याबाबत राज्य व केंद्र शासनादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. ‘गाळमुक्त धरण’ अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, तलाव व धरणांमधून काढण्यात येणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्यासोबतच शेतजमिनीची सुपीकताही वाढण्यास मदत होणार आहे.

राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. फार्मर आयडी नसल्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. वीजजोडणीअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही देण्यात आले. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीसाठी ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. पाणी साठवण, जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून देणारी कामे प्राधान्याने राबविण्यात येणार आहेत.

जलसाठे वाढविणे, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचविणे आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी संवर्धन, शेतकरी मदत आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही बाबींना प्राधान्य देत राज्य सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजनांना गती देण्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

traffic tail

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

error: Content is protected !!