
विशालक्रांती न्यूज. चिकोडी तालुका प्रतिनिधी अमर माने.
ढोणेवाडी (ता.निपाणी)येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे गौरवपूर्वक सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे स्मरण करून संविधानाप्रती आदर व्यक्त केला.
याप्रसंगी ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) श्री. संतोष कटीकर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ असून प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार आणि न्याय प्रदान करणारा महान दस्तऐवज आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवून त्यांचे प्रामाणिकपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत कार्यदर्शी शिवलिंग दिवटे, क्लार्क बबन बडगीर, कॉम्प्युटर ऑपरेटर विश्वजीत हेगळे, कर्मचारी योगेश देशकाटे, नारायण कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. अशा प्रकारे ढोणेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.









