इचलकरंजी / प्रतिनिधी : शहापूर पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात जामिनावर असलेल्या जर्मन टोळीतील सदस्य रुपेश पंडित नरवाडे याने जामिनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने त्याचा पूर्वी मंजूर झालेला जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २७९/२०२३ अन्वये भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३९८, ३९५, ३८६, ३६३, ३६४, ३४१, ४२७, १२० (ब), ३२३, ५०४ व ५०६ प्रमाणे दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी तसेच जर्मन टोळीचा सदस्य रुपेश पंडित नरवाडे, राहणार दत्तनगर, गल्ली क्रमांक १३, कबनूर, ता. हातकणंगले याचा जामीन माननीय सत्र न्यायाधीश, इचलकरंजी यांच्या न्यायालयात दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी मंजूर झाला होता.
दरम्यान, जामिनावर असताना आरोपी रुपेश नरवाडे याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०९/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम ३०९ (६) व ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.
यानंतर शहापूर पोलीस ठाण्याकडील मूळ गुन्ह्यात आरोपीने जामिनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने त्याचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. सदर अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपी रुपेश नरवाडे याचा दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी मंजूर केलेला जामीन रद्द केला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात सरकारी वकील श्रीमती एम. पी. पाटील यांनी सरकारची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडली. न्यायालयाच्या आदेशाची प्रत पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक, शहापूर पोलीस ठाणे यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.









