
जयसिंगपूर प्रतिनिधी – कोथळी परिसरात चारचाकी वाहन आडवे मारण्याच्या किरकोळ वादाने मंगळवारी रात्री अत्यंत हिंसक वळण घेतले आणि यामध्ये हरिपूर येथील व्यक्तीला जीव गमवावा लागला. विकास बाबूराव बोेंद्रे (वय 45, रा. हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री सुमारे साडेआठच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील भागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (36, रा. कोथळी, ता. शिरोळ) हा घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाला असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे
प्रवासादरम्यान वाहनांना कट मारण्याच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद क्षणार्धात हाणामारी आणि जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला. मंगळवारी रात्री विकास बोंद्रे हे आपल्या चारचाकी वाहनातून हरिपूरच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळी दुचाकीवरून संशयित अभी पाटील धडेल हा तेथून जात होता. प्रवासादरम्यान चारचाकी आणि दुचाकी यांच्यामध्ये कट मारण्यावरून किंवा वाहन आडवे येण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या कारणावरून सुरुवातीला कडाक्याची बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळल्यानंतर संशयित धडेल याने स्वतःजवळील सुरी काढून विकास बोंद्रे यांच्या गळ्यावर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
गंभीर जखमी झालेल्या विकास बोंद्रे यांना तातडीने उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालय येथे हलवण्यात आले. त्यांच्या मित्राने त्यांना रुग्णालयात नेले, मात्र तेथे पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रवासातील क्षुल्लक वादातून झालेल्या या खून प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्याच्या आसपासच्या परिसरात या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पसार झालेल्या संशयित अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल याचा शोध घेणे हे महत्त्वाचे आव्हान ठरले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या या संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. रस्ते प्रवासादरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन किंवा कट मारण्यासारख्या घटनांमधून होणारे वाद किती प्राणघातक ठरू शकतात, याचे हे दुर्दैवी उदाहरण ठरले आहे.
या घटनेकडे पाहता, वाहतुकीदरम्यान होणारे किरकोळ वाद संयमाने हाताळण्याची गरज अधोरेखित होते; अन्यथा अशा घटनांचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊन निरपराध्यांचा बळी जाऊ शकतो.









