विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी कारदगा.
ग्रामीण भागात मराठी साहित्याची अभिरुची वाढविणे, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्य-संस्कृतीचा जागर जागता ठेवण्याच्या उद्देशाने कारदगा (ता. निपाणी) येथील साहित्य विकास मंडळाच्यावतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी २९ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड (बेळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. सकाळी ८ ते रात्री ८.३० या कालावधीत चार सत्रांत होणाऱ्या या साहित्य सोहळ्यात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुस्तक प्रकाशन, लेखकाची मुलाखत, कवी संमेलन आणि विनोदी भारूड अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कारदगा येथील डी. एस. नाडगे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी राजू कुराडे यांनी स्वागत केले, तर प्रकाश काशीद यांनी संमेलनाची सविस्तर रूपरेषा विशद केली.
ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ
सकाळी ८ ते १० या वेळेत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ होईल. सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजी कागणीकर (बेळगाव) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. शिरोळ दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, तर हालसिध्दनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक उस्मानगणी पटेल (निपाणी) यांच्या हस्ते सरस्वती मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. भिवशी येथील रतन मेळवंकी यांच्या हस्ते साहित्यनगरीचे उद्घाटन, तर समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे महासचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन होणार आहे. बाळासाहेब नाडगे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत.
या सत्रात प्रा. डॉ. अच्युत माने (निपाणी) लिखित ‘स्नेहबंध’ आणि डॉ. संभाजी कुर्लीकर (कुर्ली) लिखित ‘तुझ्याविना जगताना’ या पुस्तकांचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत अध्यक्षीय भाषण होणार आहे.
उद्योजक शरद तांदळे यांची मुलाखत
दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते ४ या वेळेत सुप्रसिद्ध लेखक व उद्योजक शरद तांदळे (पुणे) यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. महेश घोटणे (कुरुंदवाड) हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला अनिल वासुदेव (इचलकरंजी) आणि अरुण नाईकवाडे (कारदगा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. लेखकाचा साहित्यिक प्रवास, उद्योजकीय अनुभव आणि विचारविश्व जाणून घेण्याची संधी या मुलाखतीतून मिळणार आहे.
‘जागर कवितेचा, गौरव मराठीचा’
दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या तिसऱ्या सत्रात ‘जागर कवितेचा, गौरव मराठीचा’ हा कवी संमेलनाचा कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये पुणे येथील डॉ. स्वप्निल चौधरी, संभाजीनगर येथील गुंजन पाटील आणि बेळगाव येथील नाईकबा गिड्डे सहभागी होणार असून आपल्या कवितांमधून ते रसिकांना साहित्यिक आनंदाची अनुभूती देणार आहेत.
विनोदी भारूडाची पर्वणी
सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या चौथ्या सत्रात संतोष महाराज पुजारी कडवेकर व सहकलाकार (सातारा) यांचा विनोदी भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. पारंपरिक भारूडाच्या माध्यमातून मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
आरोग्य व योग शिबिराचे आयोजन
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच प्राणायाम शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. योग शिक्षक बाळासाहेब नाडगे आणि यशवंत वडगावे यांच्या सहकार्याने मोफत योग, प्राणायाम व ध्यान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाला खासदार प्रियंका जारकीहोळी, आमदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार सुभाष जोशी, उत्तम पाटील, अण्णासाहेब हवले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक व रसिक उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेस साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे, उपाध्यक्ष संभाजी अलंकार, सचिव इम्रान पटेल, सुभाष ठकाणे, महादेव दिंडे, बाळासाहेब नाडगे, भाऊसाहेब चिंदके, सुनीता कोगले, सुनीता वराळे, शिवाजी माने, महावीर पाटील, अमोल व्हनवाडे, आप्पासाहेब कुरणे, सदाशिव पारगावे, प्रशांत खराडे, विनोद परीट, काशिनाथ वडगावे, अनिल खामकर, लकाप्पा गावडे, रावसाहेब सावंत, लक्ष्मण कोणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार कल्पना रायजाधव यांनी मानले.









