Edition

महाराष्ट्राच्या तरुण संशोधकाला प्रतिष्ठेची ‘EMBO’ फेलोशिप ऋषिकेश तहाकिक लँकेस्टर विद्यापीठात ९० दिवस करणार मिरचीच्या डबल्ड हॅप्लॉइड तंत्रज्ञानावर संशोधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

छ.संभाजीनगर. २३ (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील तरुण कृषी संशोधक ऋषिकेश रवींद्र तहाकिक यांना युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी ऑर्गनायझेशन (EMBO) ची प्रतिष्ठेची ‘सायंटिफिक एक्सचेंज ग्रँट’ प्राप्त झाली आहे. या अनुदानांतर्गत इंग्लंडमधील लँकेस्टर विद्यापीठात प्रा. इयान डॉड यांच्या प्रयोगशाळेत ते ९० दिवस व्हिजिटिंग रिसर्चर म्हणून संशोधन करणार आहेत.

या संशोधन भेटीसाठी त्यांना ९,६०० युरोचे आर्थिक सहाय्य आणि ३,००० पौंडांचा अतिरिक्त खर्च भत्ता मिळणार आहे. जानेवारी ते एप्रिल २०२७ या कालावधीत ते मिरची (Capsicum annuum) पिकातील ‘डबल्ड हॅप्लॉइड’ तंत्रज्ञानावर संशोधन करतील. या तंत्रज्ञानामुळे वाण विकसित करण्यासाठी लागणारा अनेक वर्षांचा कालावधी कमी करून अल्पावधीत पूर्णतः समजात जनुकीय रचना असलेली सामग्री विकसित करणे शक्य होते, ज्यामुळे पीक सुधारणा प्रक्रियेला गती मिळू शकते.

या संशोधन भेटीसाठी त्यांना ब्रिटन सरकारच्या फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) कडून ‘ॲकॅडेमिक टेक्नॉलॉजी अप्रूव्हल स्कीम’ (ATAS) प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

तहाकिक यांनी एमजीएम कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून अध्यापन केले असून, सध्या ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे डॉ. अमित जी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आण्विक जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विषयात पीएच.डी. संशोधन करत आहेत. ते शरद पवार इन्स्पायर फेलो असून, त्यांचे १४ संशोधन लेख आणि दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ICAR-JRF परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर आठवा क्रमांक मिळवला असून, ICAR-SRF, CSIR-NET, दोन वेळा ASRB-NET आणि तीन वेळा GATE परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कृषीविषयक जनजागृतीसाठी त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून सुमारे ३०० लेख लिहिले आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल एमजीएम ट्रस्टचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. अर्चना थोरात, डॉ. मंगेश मोहरील, डॉ. परमार व डॉ. पडघन, श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे डॉ. आरिफ पंडित, दिल्लीतील गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाचे प्रा. एन. रघुराम आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. पवन कुलवाल यांनी अभिनंदन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!