Edition

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार? कोयनेचे ६७.५ टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याचा सरकारचा मोठा प्लॅन!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्त्वाकांक्षी जलप्रकल्पाचे नियोजन हाती घेतले आहे. कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे तब्बल ६७.५ टीएमसी पाणी मुंबईसह कोकणातील विविध भागांकडे वळवण्याच्या प्रस्तावावर उच्चस्तरीय बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे २५ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर पोफळीमार्गे वाशिष्ठी नदीत सोडले जाणारे पाणी समुद्रात जाते. या पाण्याचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी उपयोग करण्याची सरकारची भूमिका आहे.

दोन भागांत पाण्याचे नियोजन

प्राथमिक आराखड्यानुसार ६७.५ टीएमसी पाण्यापैकी ५० टीएमसी पाणी रायगड, ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रासाठी वळवण्याचे नियोजन आहे. या कामासाठी अंदाजे १५ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर उर्वरित १७.५ टीएमसी पाणी रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी १० हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

२०९ किलोमीटरचा जलवाहिनी प्रकल्प

कोयना प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी भुयारी जलबोगदे आणि जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रापर्यंत पोहोचवण्याची संकल्पना आहे. यासाठी सुमारे २०९ किलोमीटरच्या जलवाहिनी मार्गाचे नियोजन करण्यात येत आहे.

पुढील ५० वर्षांचा विचार

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरण, औद्योगिक विकास आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यातील ५० वर्षांसाठी पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या पुढील नियोजनात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (MMRDA) महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

दरम्यान, हा प्रकल्प सध्या प्रस्ताव आणि प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यात असून तांत्रिक व्यवहार्यता, आर्थिक बाबी आणि आवश्यक परवानग्यांनंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास मुंबईसह कोकणातील पाणीपुरवठ्याला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!