Edition

उंचगावमध्ये गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात ४० मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग; शिवकालीन इतिहासाला उजाळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर प्रतिनिधी :

करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने उंचगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत उंचगावमधील तब्बल ४० मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारत आपल्या कलाकौशल्याचे व कल्पकतेचे दर्शन घडविले.
सहभागी सर्वच मंडळांनी अत्यंत मेहनतीने आणि कल्पकतेने ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या. विविध संकल्पना व वैशिष्ट्यपूर्ण रचनांमुळे स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे द्वितीय व तृतीय क्रमांक विभागून देण्यात आले.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. आजच्या आधुनिक व डिजिटल युगात नव्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देणे अत्यंत गरजेचे आहे. गड-किल्ले बांधणीच्या माध्यमातून मुलांना शिवरायांचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य, स्वराज्याची निर्मिती व गड-किल्ल्यांचे महत्त्व समजते. या स्पर्धेला ४० मंडळांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. केवळ स्पर्धा घेणे किंवा बक्षिसे देणे हा उद्देश नसून शिवरायांचे विचार आणि इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा मुख्य हेतू आहे. भविष्यातही अशा सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.”
सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, “उंचगावमध्ये अशा स्पर्धांचे आयोजन होणे ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. गावातील तरुण मंडळांनी एकत्र येऊन मेहनत व कल्पकतेच्या जोरावर सुंदर गड-किल्ले साकारले आहेत. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये एकतेची भावना निर्माण होते, तसेच ऐतिहासिक वारसा जतन करण्याची प्रेरणा मिळते. नागरिक आणि मंडळांचा प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे.”
उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य आणि गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या वास्तूंचे महत्त्व नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. गड-किल्ले बांधणी स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पकतेला वाव मिळून इतिहासाविषयी जिज्ञासा निर्माण होते. अशा उपक्रमांतून शिवरायांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा घराघरांत पोहोचायला हवी.”
स्पर्धेचा निकाल असा :
* प्रथम क्रमांक : शिवशक्ती तालीम मंडळ (यादववाडी ग्रुप)
* द्वितीय क्रमांक (विभागून) : जय शिवराय तालीम मंडळ (रेडकर गल्ली) व दर्शता मोरे ग्रुप
* तृतीय क्रमांक (विभागून) : ऋषिकेश जाधव-विराज देशमुख (मोळे कॉलनी ग्रुप) व कृष्णराज राहुल म्हसवेकर ग्रुप
* उत्कृष्ट सादरीकरण : सार्थक भोगम ग्रुप
याशिवाय सहभागी सर्व मंडळांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमास करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, युवासेना जिल्हाधिकारी कनिष्क शिंदे, युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन नागटिळक, फेरीवाला संघटनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाधिकारी योगेश लोहार, शरद माळी, उत्तम अडसूळ, प्रकाश मुदुगडे, वीरेंद्र भोपळे, शिवाजी लोहार, दीपक पोपटाणी, सुनील पारपानी, आबा जाधव, अजित चव्हाण, कृष्णात तुरुके, संदीप शेळके, धनंजय पाटील, रामराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन शरद माळी व सचिन नागटिळक यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!