कोल्हापूर दि : १८ प्रविण केर्ले
कोल्हापूर जिल्ह्यात जनगणनेचा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे.या टप्प्यात प्रगणकांनी घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती काळजीपूर्वक भरावी,यात हलगर्जीपणा नको असे निर्देश जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्यचे सह संचालक रमेश भोसले यांनी दिले. जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालाय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या स्वगणनेला १० जानेवारी २०२७ पासून प्रारंभ होणार असून साधारणतः ५ मार्चपर्यंत ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे. भोसले म्हणाले,कुटुंबातील प्रत्येक संबंधिताचे सर्व माहिती CMMSया पोर्टलमध्ये अद्ययावत करायची असून ज्या गटाची लोकसंख्या 800 च्यावर आहे,त्या गटाचे विभाजन करण्यात येणार आहे.त्यामुळे प्रगणकांनी/पर्यवेक्षकांनी हे काम अत्यंत काळजीपूर्वक करावे.या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्रगणकांविरुद्ध सेन्सस ॲक्टमधील सेक्शन-११ अंतर्गत थेट कारवाई अथवा दंड होऊ शकतो अशी माहिती देवून या मोहिमेला १० जानेवारी २०२७ पासून प्रारंभ होणार असून २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जावून जनगणना करणार आहेत. तर १ ते ५ मार्च या कालावधीत या मोहिमेचे पुनःरीक्षण करण्यात येवून अपात्र लोकांची नावे वगळण्यात येणार असल्याचे श्री भोसले यांनी यावेळी सांगितले.
या प्रशिक्षणासाठी जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, तहसीलदार तेजस्विनी पाटील,सहा.मार्गदर्शक शशांक रुखणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार , न . पा. मुख्याधिकारी,महसूल विभागाचे लिपिक व टेक्निकल असिस्टंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : जनगणना अनुषंगाने पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात अतिशय उल्लेखनीय काम केल्याचे श्री भोसले यांनी सांगून या कामाबद्दल सर्व प्रमुख अधिकारी – कर्मचारी शासनाच्या अभिनंदनास पात्र असल्याचे सांगताच महसूल कर्मचाऱ्यांनी जोरदार टाळ्यां वाजवून प्रतिसाद दिला.










