विशाल क्रांती प्रतिनिधी: प्रविण केर्ले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार गटातील काही प्रस्थापित नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीत पंकज भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते, असे सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे.
या भेटीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, ही चर्चा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना विश्वासात न घेता झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. या बातमीवर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपली बाजू मांडत हे निवेदन जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचा दावा केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत एकत्रित राष्ट्रवादीचे प्रमुख ‘पॉइंट पर्सन’ पार्थ पवार असावेत, असा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे. मात्र, याला अजित पवार गटातील जुन्या नेत्यांचा विरोध असल्याचे सांगितले जाते. पक्षातील प्रस्थापित नेत्यांना नव्या नेतृत्वाखाली काम करणे आणि एका कुटुंबाचे वर्चस्व वाढणे मान्य नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घडामोडींनंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक झाली. या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ उपस्थित होते. आता अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची बैठकही बोलावण्यात आल्याचे समजते. या बैठकीत पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सर्व घडामोडींकडे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे बोलले जाते. एकत्रित राष्ट्रवादी एनडीएचा घटक पक्ष म्हणून हवी असल्याचे संकेत असून, दोन्ही गटांमध्ये सत्ता-समतोल साधण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, या सर्व बातम्यांना अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट खरोखर एकत्र येणार का, की यामागे आणखी वेगळी राजकीय खेळी दडली आहे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











