उचगाव : (वार्ताहर)
सण-उत्सवांचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरातील रोषणाईत नसतो, तर आपल्या आनंदातील कांही क्षण दुसऱ्यांच्या आयुष्यातही आनंदाची पहाट घेऊन येतात, यातच माणुसकीचे खरे सौंदर्य दडलेले असते. याच उदात्त सामाजिक जाणिवेतून राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेच्या वतीने वंचित, उपेक्षित व गरजू घटकांची दिवाळी आनंददायी करण्याचा स्तुत्य उपक्रम उचगाव, ता. करवीर येथे राबविण्यात आला.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उपेक्षित आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या घटकांपर्यंत मायेचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने वीटभट्टी कामगार कुंटुबियांना साड्या व मुले यांना मिठाई तसेच फटाक यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या मदतीच्या माध्यमातून केवळ वस्तूंचे वाटप झाले नाही, तर आपुलकी, प्रेम, सन्मान आणि माणुसकीचा अनमोल ठेवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला.
या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला तसेच त्यांच्या दिवाळीच्या उत्साहात निश्चितच भर पडली. समाजातील दुर्लक्षित घटकांनाही सणाचा आनंद, आपलेपणाची जाणीव आणि सन्मानाने जगण्याची उमेद मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होणेकामी, दोन्ही संस्थांच्यावतीने केलेल्या आवाहनास अनुसरून – संतराम जाधव, प्रताप घेवडे, अनिल पाटील, पोपटराव देसाई (सांगली), विठ्ठल नाईक (बेळगाव), कल्पनाताई भाईगडे (पुणे), संघसेन जगतकर, शिवाजी चौगुले, तानाजी देसाई, प्रभाकर कांबळे (मुंबई), भगवान माने, शाहीन चौगले-मकानदार (इचलकरंजी), रमेश नाईक (ठाणे), काळुराम लांडगे (पुणे), रघुनाथ मुधाळे, सर्जेराव हळदकर, अनिता काळे, महादेव चक्के, संजय सासने, समीर वेंगुर्लेकर या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळे समाजातील वंचित व उपेक्षित घटकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविणे शक्य झाले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना दोन्ही संस्थांचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी, श्रीमंती ही केवळ संपत्तीच्या साठ्यात नसते, तर दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या वृत्तीत असते. मदतीचे मोल पैशांत कधीच मोजता येत नाही, कारण त्या मदती मागील प्रेम, संवेदना आणि माणुसकीची भावना अनमोल असते, असे मत व्यक्त केले.
संस्थेचे पदाधिकारी प्रताप घेवडे यांनी, समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने गरजूंच्या मदतीसाठी पुढे यावे, सहकार्याचा हात द्यावा आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले. तर संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी थोरात यांनी, आपल्या सहकार्यामुळे माणुसकीचा हा दीप अधिक तेजाने उजळणार आहे आणि समाजातील अंधारलेल्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलणार आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी अनिता काळे, संजय सासने, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, भगवान माने, शिवाजी चौगुले, सर्जेराव हळदकर, सुभाष पाटील, सुरेश पोवार, बाळासाहेब कांबळे आदी. पदाधिकारी तसेच भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










