विशाल क्रांती सांगली प्रतिनिधी – जत, तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळमधील लढतींचे निकाल जाहीर; संजयकाका पाटील यांचा निसटता विजय, गोपीचंद पडळकरांची बँकेत दमदार एन्ट्री
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी (ता. ३ नोव्हेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विजय मिळवला. विशेषतः तासगाव सोसायटी गटातील संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची ठरली. अवघ्या एका मताने संजयकाका पाटील यांनी विजय मिळविल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या निकालाची चर्चा सुरू झाली आहे.
जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. पडळकर यांना ५४, तर विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. या विजयामुळे पडळकर यांची सांगली जिल्हा बँकेत प्रथमच संचालक म्हणून एन्ट्री झाली आहे. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला.
तासगाव सोसायटी गटातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. संजयकाका पाटील यांना ३९, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. या निकालामुळे आमदार रोहित पाटील यांच्या गटाला राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
कवठेमहांकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विजय मिळवला. त्यांना ३७ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी टी. व्ही. पाटील यांना ३३ मते मिळाली. अवघ्या चार मतांच्या फरकाने घोरपडे यांनी ही जागा जिंकली.
मिरज सोसायटी गटातून काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे यांनी भाजपचे अनिल शेगुणशे यांचा पराभव केला. कोरे यांना ४७, तर शेगुणशे यांना १९ मते मिळाली. त्यामुळे मिरज मतदारसंघात कोरे यांनी स्पष्ट विजय नोंदवला.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण २१ संचालक जागांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. जिल्ह्यातील २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ९३.९१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
सहकारातील सत्तासमीकरणांकडे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या या निकालांमुळे सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एका मताने झालेला विजय, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठेची लढत आणि नव्या चेहऱ्यांची संचालक मंडळातील एन्ट्री यामुळे आगामी काळात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











