Edition

अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले! अज्ञात वाहनचालकाला अटक करण्याची नातेवाईकांची मागणी; मृतदेहासह गाठले पोलीस ठाणे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी : संतोष भालेराव

वाशिम : मालेगाव–रिसोड मार्गावरील किन्हीघोडमोड फाट्याजवळ १० ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सतीश सुपाजी कंकाळ (रा. दापुरी) या तरुणाचा १९ ऑक्टोबर रोजी सकाळी नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दापुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनचालकाला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह शिरपूर पोलीस ठाणे गाठले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नेमकी घटना काय?
शिरपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापुरी येथील सतीश सुपाजी कंकाळ ( वय ३५ ) आणि नारायण त्र्यंबक इंगोले (वय ६०) हे दोघे १० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डिझेल आणण्यासाठी दुचाकीने पेट्रोलपंपाकडे जात होते. दरम्यान, किन्हीघोडमोड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सतीश कंकाळ यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन चिमुकल्या मुलींचे पितृछत्र हरपले
मृत सतीश कंकाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली, आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कंकाळ कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अज्ञात वाहनचालकाला अटक करण्याची मागणी
अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन संबंधित चालकाला तातडीने अटक करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे शिरपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी नातेवाईकांशी संवाद साधला. संबंधित वाहनाचा शोध घेऊन वाहनचालकाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नातेवाईकांचे समाधान झाले.
अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वाहनाचा लवकरच शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी दिली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!