🚨 रेकॉर्डवरील आरोपीकडून विनापरवाना पिस्टल जप्त; ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!
ईश्वरपुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; एक जिवंत काडतूसही जप्त
ईश्वरपूर : सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईची मोहीम तीव्र केली असून, ईश्वरपुरात विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अबुबकर हारुणरशीद मणेर (वय २६, रा. मणेर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस, असा एकूण ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल हणमंत लोहार आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी अबुबकर मणेर हा ईश्वरपुरातील बंद पडलेल्या जलतरण तलावासमोर कमरेला पिस्टल लावून थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता एक संशयित व्यक्ती आढळून आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल हणमंत लोहार यांनी त्याला ओळखल्यानंतर पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अबुबकर हारुणरशीद मणेर असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. पिस्टलच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूसही मिळाले. या अग्निशस्त्राचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले. तसेच, हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षिततेसाठी विकत घेतल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी संबंधित पिस्टल आणि जिवंत काडतूस पंचांसमक्ष जप्त केले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल हणमंत लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०६/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
रेकॉर्डवरील आरोपी; यापूर्वीही गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुबकर मणेर हा रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही शस्त्र अधिनियम आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरोधात यापुढेही प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कारवाईत सहभागी पथक
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल हणमंत लोहार, अतुल माने, अरुण पाटील, महेश संकपाळ, पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटणकर यांचा सहभाग होता.












