
रायबाग प्रतिनिधी – खेळामध्ये जिंकणे किंवा हरणे यापेक्षा क्रीडा स्पर्धेत स्पर्धात्मक भावनेने सहभागी होणे अधिक महत्त्वाचे आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्ती विकसित होते, असे प्रतिपादन आमदार डी. एम. इहोळे यांनी केले.
रायबाग येथील केएलई संस्थेच्या मलगौडा पाटील बीसीए महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी उपसंचालक कार्यालयाच्या वतीने शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार इहोळे बोलत होते.
क्रीडा स्पर्धांमध्ये निर्णय घेताना कोणताही भेदभाव न करता पारदर्शकपणे आणि योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी पंच व निर्णयकर्त्यांनी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.
कुप्पनवाडी मुरुगेंद्र निवासी शाळेचे अध्यक्ष डॉ. के. पी. धरी गौडा म्हणाले की, क्रीडा स्पर्धांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये साहस, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा आहे. विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. पाटील होते. यावेळी अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, सदस्य डी. एल. मिरजे, व्ही. पी. पाटील, एम. एम. निशानदार, जिल्हा क्रीडा समन्वयक एस. एस. सनडी, कुशल शेट्टी, बीसीए महाविद्यालयाचे समन्वयक सुदर्शन हुलीकोप्पे, शारीरिक संचालक शिवानंद खवतकोप्पे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.











