वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द परिसरात मागील काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. परिसरात सोयाबीन, तूर आणि हळद या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती.
दरम्यान, आज २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास दापुरी खुर्द परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून, पिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, आगामी काळातही समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.











