
नवी दिल्ली, दि. ४ ऑगस्ट : दि. २८ जुलै रोजी निपाणी येथील गांधी हॉस्पिटलजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या रिटेनिंग वॉलचा काही भाग कोसळून आतील माती बाहेर उघडी पडल्याची गंभीर घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बेळगाव–कोल्हापूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४८) अंतर्गत होनगा ते कोगनोळी या टप्प्यात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत *निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले* यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. तसेच या मार्गावरील रस्त्याच्या पृष्ठभागासह एकूणच कामाच्या गुणवत्तेबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित कंत्राटदार व निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मा. नितीन गडकरी यांनी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेत तात्काळ संबंधित कंत्राटदाराशी दूरध्वनीवर संपर्क साधला. निकृष्ट दर्जाचे काम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत भविष्यात अशा प्रकारची त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत (Blacklisted) टाकण्यात येईल, असे त्यांनी बजावले. तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मा. गडकरी यांनी या महामार्गावरील कामाच्या गुणवत्तेवर स्वतः लक्ष ठेवून नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व अडथळामुक्त प्रवास मिळावा, यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी खासदार तथा बेलगावी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब जोल्ले तसेच माजी खासदार श्री. उमेश जाधव उपस्थित होते.











