
सांगली प्रतिनिधी – चांदोली वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून धरण आज (25 जुलै) सकाळी 79.26 टक्के भरले आहे. वाढती आवक लक्षात घेऊन धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज पहाटे 2 वाजल्यापासून विद्युतगृहातून वारणा नदीपात्रात 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वारणा धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी रात्री 1 वाजता आदेश देण्यात आल्यानंतर पहाटे 2 वाजल्यापासून विद्युतगृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहून धरणातील पाण्याची आवक वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आज सकाळी 6 वाजता धरणाची पाणीपातळी 619.15 मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा 27.27 टीएमसी म्हणजेच 79.26 टक्के झाला असून उपयुक्त पाणीसाठा 20.39 टीएमसी (74.08 टक्के) इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त पाणीसाठा 21.23 टीएमसी (77.15 टक्के) होता.
गेल्या 24 तासांत धरणात 8,258 क्युसेक वेगाने पाण्याची आवक झाली असून पाणीसाठ्यात 0.71 टीएमसीची वाढ झाली आहे. चालू पावसाळी हंगामात आतापर्यंत धरणातील पाणीसाठ्यात 16.07 टीएमसीची वाढ झाली आहे.
दरम्यान, धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत 51 मिमी, तर पाथरपुंज येथे 29 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान धरण क्षेत्रात 1,284 मिमी, तर पाथरपुंज येथे 3,143 मिमीपर्यंत पोहोचले आहे.
सध्या स्पिलवे आणि कालवा बंद असून केवळ विद्युतगृहातून 800 क्युसेक विसर्ग सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.











