फलटण वृत्तसेवा : भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेश व झारखंडमधील तिघांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (दि. २३) रात्री वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारचालक मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील एका कंपनीच्या हॉस्टेलमध्ये राहणारे युवक रात्री जेवणासाठी मह्याद्री हॉटेल, बडेखान येथे गेले होते. जेवणानंतर ते स्वीफ्ट डिझायर (एमएच १६ एटी १७५६) कारने हॉस्टेलकडे परतत होते. यावेळी नाथवडे घाट परिसरात फिरून परतताना मोहम्मद हुसेन याने कार चालविण्यास घेतली.
पुसेगाव-फलटण मार्गावर वाठार निंबाळकर हद्दीत कार आली असता चालकाचा ताबा सुटला. कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नालीवरील कठड्याला धडकून उलटली. अपघातात मोहम्मद हुसेन, अनिल हेवरम आणि सदानंद पूर्ती (तिघेही झारखंड/उत्तर प्रदेश येथील) यांचा मृत्यू झाला. गौरव कुमार व एम.डी. सितारे हे जखमी असून त्यांच्यावर बारामती व फलटण येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार तपास करीत आहेत.












