Edition

बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड ग्रामीण मातीतून घडलेले शिक्षणसेवेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व; २६ वर्षांच्या अखंड सेवेला राज्यस्तरीय सन्मान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपुर प्रतिनिधी – शिक्षण क्षेत्रातील समर्पण, गुणवत्ता, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि समाजाभिमुख कार्य यांची राज्यस्तरावर पुन्हा एकदा दखल घेत संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित माध्यमिक आश्रम शाळा, हातकणंगले येथील गुणवंत गणित शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) येथे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि. ३ नोव्हेंबर १९६८ रोजी सांगली जिल्ह्यातील मालेवाडी या छोट्याशा गावात अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि कष्टमय जीवन यांवर मात करत त्यांनी मजुरी करून शिक्षण पूर्ण केले आणि एम.एस्सी., बी.एड. ही पदवी संपादन केली. ज्ञान हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या दृढ विश्वासातून त्यांनी शिक्षक व्यवसाय स्विकारला.गेली २६ वर्षे ते माध्यमिक आश्रम शाळा, हातकणंगले येथे भटक्या व विमुक्त समाजातील निवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना अत्यंत समर्पित भावनेने शिक्षण देत आहेत. विशेषतः गणित विषय अत्यंत सोपा, रंजक आणि कृतीप्रधान पद्धतीने शिकविणे, विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने गणित समजावून सांगणे, ही त्यांची विशेष ओळख आहे.
शालेय अध्यापना पुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहिले नाही. आपल्या मालेवाडी गावात त्यांनी अनेक वर्षे विनामूल्य करिअर मार्गदर्शन, व्यवसाय शिक्षण, उन्हाळी शिबिरे, बालसंस्कार शिबिरे, हस्ताक्षर सुधारणा वर्ग, वाचन-लेखन वर्ग तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक उपक्रम राबविले. समाजात बचतीची सवय निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले. गावातील अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक संस्थांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेत समाज कार्यातही मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेत सन २०१८ मध्ये “जिल्हास्तरीय भास्कराचार्य आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार” त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या गणित विषय समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे.
अध्यापना सोबतच त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी (BLO) म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत मतदान जनजागृती, मतदार नोंदणी आणि लोकशाही बळकटीकरणासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय, निमशासकीय आणि इतर प्रतिष्ठित सेवांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या यशामागे श्री. पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन असल्याची भावना अनेक विद्यार्थी व्यक्त करतात.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) येथे सदस्य म्हणून झालेली त्यांची निवड ही केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, समर्पित शिक्षकवृत्ती आणि समाज सेवेचाही गौरव आहे.या यशाचे संपूर्ण श्रेय ते संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब डांगे, प्रेरणास्थान श्री. चिमणभाऊ डांगे, मुख्याध्यापक श्री. दिलीप शिरसाठ, मार्गदर्शक श्री. विठ्ठलराव मुसाई, सौ. हिराताई मुसाई, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर, श्री. प्रदीप वाजे, श्री. महेश वाजे, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार, कुटुंबीय आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अर्पण करतात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत शिक्षणाची स्वप्ने रुजवणारे, गणित विषयाची भीती दूर करून आत्मविश्वास जागवणारे आणि शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानणारे श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची बालभारतीच्या सदस्यपदी झालेली निवड ही संपूर्ण शिक्षक समाजासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.त्यांच्या या निवडीबद्दल मालेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी इंजि.भास्कर पाटील, अभिजित पाटील, विलासराव कोळेकर, डॉ.महेश वाजे,पवन पाटील, सुरेश घोरपडे, सुजित पाटील आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!