Edition

येलूर येथे ११ केव्ही वाहिनीवर झाड कोसळून चार गावांचा वीजपुरवठा खंडित, महावितरणच्या तत्परतेने चार तासांत २२५० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली, दि. ७ जुलै २०२६ : महावितरणच्या ईश्वरपूर-२ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या येलूर(ता.वाळवा) गावात सोमवारी (दि.०६) सायंकाळी चारच्या सुमारास ११ केव्ही इटकरे गावठाण वीजवाहिनीवर मोठे झाड उन्मळून पडले. वीज वाहिनीचे मोठे नुकसान होऊन चार गावांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. यामुळे सुमारे २२५० इतके ग्राहक प्रभावित झाले होते. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेचे व परिस्थितीचे गांभीर्य ओळखत युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेत अवघ्या चार तासांतच संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत केला.

मोठे झाड कोसळल्यामुळे अकरा पोल दरम्यान असलेल्या वीज तारा तुटल्या होत्या तर दोन पोल पडले होते. परिणामी तांदुळवाडी शाखा कार्यालयांतर्गत तांदुळवाडी, मालेवाडी, कणेगाव आणि भरतवाडी या चार गावांचा वीजपुरवठा प्रभावित झाला. याशिवाय येलूर गावातील चार वितरण रोहित्रांचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम अधिक वेळखाऊ ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच कामाचे स्वरूप मोठे असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार होती.

महावितरणच्या सौदामिनींनी पेलले आव्हान.

  1. महावितरणच्या तीन सौदामिनींनी या अडचणीच्या स्थितीत आव्हान स्वीकारले. तांदुळवाडी शाखाधिकारी प्राची गायकवाड, येलूर शाखाधिकारी वर्षा शिंदे, कुरळप शाखाधिकारी सुमित्रा यादव तसेच त्यांच्या २३ जनमित्रांनी कोणत्याही ठेकेदार अथवा बाह्य यंत्रणेची प्रतीक्षा न करता तातडीने घटनास्थळी पोहोचून कामाला सुरुवात केली. पाहणी अंती सिमेंटचे पडलेले खांब सुरक्षित असल्याने त्यांना परत उभे केले. इतर वाकलेले लोखंडी खांब सरळ करून तुटलेल्या वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली व आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली.

महावितरणच्या पथकाने समन्वय, कौशल्य आणि वेग यांचा उत्कृष्ट मेळ साधत ११ केव्ही वाहिनी अवघ्या चार तासांत पूर्ववत केली. त्यामुळे तांदुळवाडी, मालेवाडी, कणेगाव, भरतवाडी तसेच येलूर येथील चारही वितरण रोहित्रांचा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. प्रतिकूल परिस्थितीतही अतिरिक्त यंत्रणेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन काम पूर्ण करणाऱ्या अधिकारी, जनमित्र आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हजारो वीजग्राहकांची गैरसोय टळली. या कामाकरिता परिसरातील नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!