Edition

मुंबईतील मुसळधार पावसामुळे शक्तीपीठ विरोधी आंदोलन स्थगित; नवी तारीख लवकरच जाहीर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कामेरी, प्रतिनिधी – नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी मंगळवार, ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेले एकदिवसीय धरणे आंदोलन मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्थेत झालेल्या ‘शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती’च्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
समितीचे नेते कॉ. धनाजी गुरव यांनी आंदोलनाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगितले. हवामान विभागाने मुंबई व परिसरात पुढील २४ ते ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल होणार होते. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, दरडी कोसळण्याची शक्यता, वाहतुकीतील अडथळे आणि आझाद मैदानावरील गर्दीचे व्यवस्थापन कठीण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संघर्ष समितीने हा निर्णय घेतला.
पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलन स्थगित झाले असले, तरी शेतकऱ्यांचा लढा कायम राहणार असून पावसाचा जोर ओसरल्यानंतर नव्या तारखेस अधिक व्यापक स्वरूपात आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला.
बैठकीत जिल्हानिहाय समन्वय अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील आंदोलनात अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
या बैठकीला कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील (काका), शामराव पाटील, प्रा. अनिल पाटील, अॅड. विजय पाटील, सौ. छायाताई पाटील यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!