भाग्यनगर, ता. खानापूर (दि. 3 जुलै): शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनाची तयारी सांगली जिल्ह्यात वेगाने सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार व मंत्रिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शक्तीपीठ बाधित शेतकरी मुंबईत धडकणार असल्याची माहिती पलूस-कडेगाव-खानापूर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दिपक लाड यांनी दिली.
शुक्रवारी (दि. 3) भाग्यनगर (ता. खानापूर) ग्रामपंचायत कार्यालयात ॲड. दिपक लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई आंदोलनासाठी गावनिहाय नियोजन, प्रवास व्यवस्था आणि शेतकरी सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना ॲड. लाड यांनी सांगितले की, भाग्यनगर येथून महिला शेतकरी आंदोलकांसह शेकडो शेतकरी चार ट्रॅव्हल्स भरून मुंबईकडे रवाना होणार आहेत. तसेच खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यातील विविध गावांतूनही हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी सज्ज असून त्यासाठी गावागावांत नियोजन बैठका सुरू आहेत.
बैठकीस संघर्ष समितीचे महेश कुपाडे, किरण चव्हाण, दीपक कदम उपस्थित होते. तसेच महादेव जगताप, संताजी जगताप, अनुराज काटकर, नागनाथनगरचे संभाजी निकम (माजी चेअरमन), भीमराव निकम, मनोज निकम आणि अक्षय सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघर्ष समितीच्या वतीने 7 जुलैच्या मुंबई आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.











