Edition

कोल्हापूर शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुखपदी विराज पाटील; पक्षाकडून अधिकृत नियुक्ती.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर वृत्तसेवा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी विराज पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्हाप्रमुखपद रिक्त झाले होते. त्यानंतर नव्या जिल्हाप्रमुखाच्या निवडीबाबत पक्षामध्ये विविध नावांची चर्चा सुरू होती. अखेर पक्षाने विराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
विराज पाटील हे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असून त्यांनी करवीर तालुकाप्रमुख म्हणून प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली आहेत.
विशेषतः पाचगाव पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नेतृत्व केले होते. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.
दरम्यान, जिल्हाप्रमुखपदासाठी विराज पाटील यांच्यासह अवधूत साळोखे, राजू यादव आणि तानाजी आंग्रे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने संघटनात्मक अनुभव, सक्रिय कार्यशैली आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन विराज पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
विराज पाटील हे शिवसेना उपनेते संजय पवार यांचे समर्थक मानले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे) पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!