

पलूस प्रतिनिधीं : कराड–तासगाव महामार्गावरील घोगाव (ता. पलूस) येथे मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालक व एका किन्नराचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कुंडल पोलीस ठाणे व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातानंतर कराड–तासगाव महामार्गावरील अपूर्ण पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. दिपक लाड यांनी महामार्ग विभागावर तीव्र टीका करत घोगाव हद्दीतील दोन व कुंडल हद्दीतील चार पुलांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी जुने अरुंद पूल कायम असल्याने भरधाव वाहनांना अचानक वेग कमी करावा लागतो. त्यामुळे वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. रात्री वाहनचालकांना मार्गदर्शनासाठी आवश्यक असलेले रिफ्लेक्टर नसणे, पुलांवर सुरक्षा कठडे नसणे तसेच रस्त्यालगत वाढलेल्या हत्ती गवतामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्ग विभागाने तातडीने सर्व अपूर्ण पुलांची कामे पूर्ण करावीत, रिफ्लेक्टर बसवावेत, सुरक्षा कठडे उभारावेत आणि रस्त्यालगतची झाडी हटवून प्रवाशांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी अॅड. लाड यांनी केली आहे.
दरम्यान, रखडलेल्या पुलांच्या कामाबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास संबंधित पुलावर रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अॅड. दिपक लाड यांनी दिला आहे.











