Edition

इचलकरंजीतील बेकरी, हॉटेल व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करा; जनरल लेबर युनियनची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी प्रतिनिधी – इचलकरंजी शहर व परिसरातील बेकरी, हॉटेल, धाबे, खाद्यतेल उत्पादक, पानशॉप तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची सखोल तपासणी करून भेसळखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनरल लेबर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जनरल लेबर युनियनचे अध्यक्ष कॉ. आनंदा गुरव यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच इचलकरंजी विभागाच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. इचलकरंजी हे कामगारवस्तीचे मोठे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर बेकरी व्यवसाय चालतो. अनेक किराणा दुकाने व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये तळलेले व तेलकट पदार्थ साध्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये साठवून विक्रीस ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अशा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे युनियनने म्हटले आहे. अलीकडेच इचलकरंजीलगत एका पनीर निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील बेकरी, हॉटेल, धाबे, खाद्यतेलाचे डेपो, पानशॉपमधील मावा, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे तसेच गोदामांमधून विक्री होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासून ते मानवी आरोग्यास सुरक्षित आहेत का याची खातरजमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भेसळयुक्त व बनावट खाद्यपदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनावर कॉ. आनंदा गुरव यांच्यासह रमेश खोत, रुपेशी कांबळे, दिपक लोखंडे, सुनिल खोत, प्रविण केरळे आणि सार्थक खामकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!