
जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव,रिसोड : डोणगावाहून रिसोडकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या खासगी वाहनाचा टायर अचानक फुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट उलटले. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ९.४५ वाजता रिसोड-मालेगाव मार्गावरील बिबखेडा परिसरात घडली.
मृतकाचे नाव संतोष नारायण गवळी (वय ३६, रा. नावली, ता. रिसोड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२६-एस-१८४१ क्रमांकाचे खासगी प्रवासी वाहन डोणगावाहून रिसोडकडे येत असताना बिबखेडाजवळ त्याचा टायर फुटला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त होऊन उलटले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून १४ जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले.
पत्नी आणि मुलासमोरच पतीचा मृत्यू
संतोष गवळी हे पत्नी आरती आणि पाच वर्षीय मुलगा गणेश यांच्यासह रिसोडकडे येत होते. रिसोडपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर झालेल्या या अपघातात संतोष गवळी यांचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यासमोर पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून पत्नी आरती गवळी यांनी मुलाला कवटाळून हंबरडा फोडला. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे डोळेही पाणावले होते.
अपघातातील जखमी
परमेश्वर बबन शिंदे (वय ५०, नावली), लता दीपक खरात (४२, नावली), शोभा परमेश्वर कोरडे (३५, मांगुळझनक), देविदास यादव खंडारे (५२, नेतंसा) कृष्णा रामेश्वर कोरडे (१६, मांगुळझनक), आरती संतोष गवळी (२७, नावली), सतीश जगन्नाथ भिसे (३८, अंचळ), गणेश संतोष गवळी (५, नावली), गोदावरी शामराव मोरे (७२, मांगवाडी), लताबाई दत्तराव रायवाडे (५०, पळशी, जि. हिंगोली), दीपक रामभाऊ खरात (४५, नावली), पंकज भास्कर खरात (२७, नावली), शारदा बळीराम वाघ (५५, गोवर्धन), बळीराम पंढरीनाथ वाघ (६९, गोवर्धन).
अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
या अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ग्रामीण भागात नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.











