जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : १९ जून जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत मद्यपान करून वाहन चालविणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे, हेल्मेटचा वापर न करणे, रॉंग साईडने वाहन चालविणे तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.
रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मानवी चुका हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः मद्यपान करून वाहन चालविणे व ट्रिपल सीट प्रवास यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे वाहनचालकांसह इतर नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रमही राबविण्यात येत आहेत. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, सीटबेल्ट बांधणे, मद्यपानानंतर वाहन न चालविणे, ट्रिपल सीट प्रवास टाळणे तसेच वाहने निर्धारित वेगमर्यादेत चालविणे, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे पालन केल्यास रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांच्या जीविताचे संरक्षण होण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी जबाबदार नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व सुरक्षित वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
सदर अभियानास निकेश खाटमोडे पाटील व लता फड यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यात रस्ते सुरक्षा व अपघातमुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाई व जनजागृती उपक्रमांना सातत्याने प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.











