
जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव
वाशिम : विदर्भातील पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला पर्यायी उपाय म्हणून रिसोड तालुक्यातील वडजी गावात वातावरणातील आर्द्रतेतून पिण्याचे पाणी निर्माण करणारे अत्याधुनिक अॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन (AWG) यंत्र बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे वडजी हे राज्यातील एकमेव गाव असून, या उपक्रमामागे तत्कालीन सरपंच शत्रुघ्न मधुकर बाजड यांची दूरदृष्टी आणि पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.
विदर्भातील अनेक भागांप्रमाणेच रिसोड तालुक्यातही पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या (Central Ground Water Board) अहवालानुसार तालुक्यातील जवळपास ४० गावे ‘अर्ध-गंभीर’ (Semi-Critical) भूजल परिस्थितीत आहेत. उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढत असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर वडजी ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण पाऊल उचलत हवेतून पाणी तयार करणारे यंत्र गावात आणले.
सी.एस.आय.आर.–इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (CSIR-IICT), हैदराबाद व तेथील तत्कालीन डारेक्टर डॉ. चंद्रशेखर यांच्या सहकार्याने प्राप्त करण्यात आलेले हे ‘मेघदूत’ नावाचे यंत्र आजही गावातील नागरिकांना, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीत हे यंत्र बसविण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
दररोज ५०० लिटर पाण्याची निर्मिती
‘मेघदूत’ यंत्राद्वारे वातावरणातील आर्द्रता (हवेतील पाण्याचे सूक्ष्म कण) शोषून त्याचे संक्षेपण (Condensation) केले जाते. या प्रक्रियेत तयार झालेले पाणी साठवण टाकीत जमा केले जाते. त्यानंतर ते आवश्यक खनिजे (Minerals) मिसळणाऱ्या यंत्रणेतून व विविध फिल्टरमधून प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनविले जाते. हे यंत्र दररोज सुमारे ५०० लिटर शुद्ध पाणी तयार करण्याची क्षमता ठेवते.
‘मेघदूत’ची निर्मिती भारतीय शास्त्रज्ञांची देणगी
या यंत्राचा विकास सी.एस.आय.आर.–आयआयसीटी, हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी केला आहे. यामध्ये डॉ. श्रीधर, डॉ. व निवेदिता साहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासात सी.एस.आय.आर.–आयआयसीटी आणि मैत्री अक्वाटेक यांचे संयुक्त योगदान आहे.
पाणीटंचाईवरील शाश्वत उपाय
हवेतून पाणी निर्माण करण्याचे हे तंत्रज्ञान पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी एक प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरू शकते. वडजी ग्रामपंचायतीने वेळेआधीच या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात अशा उपक्रमांची व्याप्ती वाढल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते.
वातावरणातून पाणी निर्मिती यंत्रणा (Atmospheric Water Generation – AWG) ही एक आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे जी वातावरणातील आर्द्रता (हवेतील जलवाष्प) शोषून त्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करते. या प्रक्रियेत प्रथम फॅनद्वारे आर्द्र हवा यंत्रात खेचली जाते व फिल्टरच्या साहाय्याने धूळ, परागकण आणि इतर अशुद्धी काढून टाकल्या जातात. त्यानंतर रेफ्रिजरेशन प्रणालीद्वारे हवा तिच्या दवबिंदू (Dew Point) तापमानापर्यंत थंड केली जाते, ज्यामुळे हवेमधील जलवाष्पाचे संघनन होऊन पाण्याचे थेंब तयार होतात. हे पाणी संकलन टाकीत जमा केले जाते आणि पुढे कार्बन फिल्टर, यूव्ही निर्जंतुकीकरण किंवा इतर शुद्धीकरण प्रक्रियांद्वारे स्वच्छ व सुरक्षित बनविले जाते. शेवटी हे शुद्ध पाणी साठवून पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. ही प्रणाली विशेषतः पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये उपयुक्त असून भूजल किंवा पृष्ठभागीय जलस्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते.
डॉ. शत्रुघ्न मधुकर बाजड हे याच संस्थेत पी.एच.डी. करत होते तेव्हा कोरोनाच्या संकट काळातही संस्थेने आपल्या गावातील लोकांना मास्क व फेसशिल्ड सारख्या गोष्ठी देऊन मदत केली होती; डॉ. शत्रुघ्न मधुकर बाजड यांनी सी.एस.आय.आर.–आयआयसीटी, हैदराबाद, तत्कालीन डारेक्टर डॉ. चंद्रशेखर व शास्त्रज्ञ यामध्ये डॉ. श्रीधर, डॉ. निवेदिता साहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानले.











