सातारा :* छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आणि गड-किल्ल्यांचा अभिमान नव्या पिढीच्या मनामनांत रुजविण्याचे सुंदर कार्य साताऱ्यातील *तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक* या बाल शिवशिलेदारांनी आपल्या कलाकृतीतून साकारले आहे. आपल्या कल्पकतेला मेहनतीची जोड देत या चिमुकल्यांनी तयार केलेला किल्ला सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या किल्ल्याची रचना अत्यंत आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्ल्याभोवती निळ्याशार पाण्याचा खंदक तयार करण्यात आला असून, त्याच्या आतील बाजूस काळ्या दगडी बांधकामाची भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीवर पांढऱ्या रंगाने रेखाटलेल्या दगडांच्या रेषांमुळे किल्ल्याला ऐतिहासिक गडाचे वास्तवदर्शी स्वरूप प्राप्त झाले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना, दोन्ही बाजूंना उभारलेले बुरूज, तटबंदीवरील पहारेकरी आणि संरक्षणासाठी केलेली व्यवस्था विशेष लक्षवेधी आहे.
किल्ल्याच्या मध्यभागी उंच चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या असून, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण किल्ल्याच्या रचनेला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. किल्ल्याच्या आतील भागात मावळे, सैनिक, नागरिक, घरे, मंदिरे, झाडे, बागा आणि विविध दैनंदिन जीवनातील प्रसंग लहान लहान प्रतिकृतींच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. ठिकठिकाणी उभारलेले बुरूज, पहाऱ्याची व्यवस्था, सजविलेली प्रवेशद्वारे आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे हा किल्ला जणू शिवकालीन स्वराज्याची छोटीशी प्रतिकृतीच वाटतो.
विशेष म्हणजे, किल्ल्याच्या प्रत्येक भागात बारकाईने केलेले काम, रंगसंगती, मांडणी आणि ऐतिहासिक वातावरण निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न या बालकांच्या कलात्मक दृष्टिकोनाची साक्ष देतो. या बालशिवभक्तांनी इतिहासाची आवड, सर्जनशीलता, कल्पकता आणि आपल्या संस्कृतीविषयीचे प्रेम त्यांनी या माध्यमातून व्यक्त केले आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विश्वात रमणाऱ्या मुलांसमोर तन्मय आणि रुद्र यांनी प्रत्यक्ष कृतीतून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शिवरायांच्या इतिहासाविषयीची आस्था केवळ पुस्तकांपुरती न ठेवता ती आपल्या हातांनी साकारण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.










