_सदलगा | दि. ७ नोव्हेंबर २०२६_
सदलग्यात गोडाऊन टेकाजवळ ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घरात घुसल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच जनावरांनाही इजा झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शेतकरी संघटनेचे आंदोलन संपून कालपासून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. जवाहर साखर कारखाना, हुपरीकडे ऊसाने भरलेल्या दोन-दोन ट्रॉली असलेले दोन ट्रॅक्टर एका पाठोपाठ उतारावरून निघाले होते.
दरम्यान, मागच्या ट्रॅक्टरची पुढच्या ट्रॅक्टरला धडक बसणार होती. ती टाळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर डाव्या बाजूला वळवला.
त्यावेळी ट्रॅक्टर सदलग्यात गोडाऊन टेकाजवळ, रुद्र जिमच्या पलीकडे असलेल्या अशोक लट्टे यांच्या घराकडे गेला आणि घराबाहेरील पत्र्याच्या शेडला जाऊन टेकला.
घरातील मंडळी व परिसरातील नागरिक यावेळी घरात व आसपास होते. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
गळीत हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
*वार्ताहर, अनिलकुमार डेक्कण्णावर, सडलगा (नेज)*










