ईश्वरपूर दि. ४ – डोंगरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली येथील दलित मागासवर्गीय समाजातील रविंद्र सकटे व महादेव सकटे या कुटुंबीयांच्या पूर्वजांना सन १८६१ साली मिळालेल्या सुमारे साडेअकरा एकर शेतजमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरण व बळकावण्याच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच पिडित सकटे कुटुंबीयांना न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी वाळवा तालुका *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने बुधवार दि. ७/१०/ २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी, ईश्वरपूर यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
सकटे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पूर्वजांना सन १८६१ मध्ये सदरची शेतजमीन मिळालेली असून महसुली अभिलेखातील ७/१२ पत्रकी भोगवटा क्र. २ अशी त्यांच्या नावे नोंद आहे. सन १८६१ पासून आजपर्यंत या जमिनीवर सकटे कुटुंबीयांची वहिवाट व ताबा असून तसेच शासनाकडून सदर जमिनीवर सकटे कुटुंबीयांना विहीरी व घरे बांधून देण्यात आली असून सकटे कुटुंबीय सध्या याच ठिकाणी वास्तव्यास आहेत.
मात्र, सदर जमीनीचा वाद ईश्वरपूर येथील न्यायालयात न्यायप्रविष्ट असून तिच्या हस्तांतरणास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही, चिकुर्डे ता. वाळवा येथील तथाकथित सरकारने सकटे कुटुंबीयांच्या अशिक्षितपणाचा व कायदेविषयक अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कथित बोगस सह्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे महसूली अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन बळकावल्याची तक्रार सकटे कुटुंबीयांनी कुरळप पोलीसात मागील एक महिन्यापूर्वी केली आहे. मात्र, तक्रारीतील आरोप फौजदारी स्वरूपाचे असतानाही त्याकडे दिवाणी वाद म्हणून पाहून कुरळप पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पिडित कुटुंबीयांनी केला आहे. आणि उलटपक्षी पिडित सकटे कुटुंबीयांवरच कुरळप पोलीसांनी गुन्हा दाखल करून अन्यायकारक कारवाई केली आहे.
त्यामुळे सदर प्रकरणाची स्वतंत्र व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करून, तक्रारीतील तथ्यांच्या आधारे संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच पिडित सकटे कुटुंबीयांना संरक्षण व न्याय मिळवून द्यावा. या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आरपीआय (आ) पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी म्हटले आहे.
तेंव्हा वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तसेच समविचारी पक्ष व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आरपीआय (आ) सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव व वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी केले आहे.











