ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, सातत्य आणि संघर्षाच्या बळावर शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे संशोधक व प्रसिद्ध डॉक्युमेंट्री चित्रपट निर्माते डॉ. सोमनाथ वाघमारे यांचा मालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. वाघमारे यांनी मुंबई येथील नामांकित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) येथून आपली पीएच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, या संस्थेतून पीएच.डी. पदवी मिळवणारे ते सांगली जिल्ह्यातील पहिले संशोधक ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दहावीतील अपयशाने खचून न जाता त्यांनी शिक्षणाची कास धरली. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे डॉ. वाघमारे यांच्या प्रवासातून सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
मालेवाडीतील ग्रामस्थांनी डॉ. वाघमारे यांच्या यशाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे आणि शैक्षणिक कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील तरुणांनी परिस्थितीची कारणे न देता शिक्षणाच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास माजी सरपंच रंगराव बाबुराव जाधव, राजाराम बापू पाटील सहकारी बँकेचे संचालक संभाजी पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विलास पाटील, पत्रकार विलासराव कोळेकर, शिव समर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष योगेश नलावडे, डॉ. महेश वाजे, मधुकर पाटोळे, जयसिंग पाटील सर, मिलिंद वाजे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सोमनाथ वाघमारे यांच्या यशामुळे मालेवाडीच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.











