पेठ प्रतिनिधी – संदीप वाटेगावकर, विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जागतिक स्तरावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आपल्या क्षमता ओळखून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करून संशोधनाला चालना द्यावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व डी वाय पाटील विद्यापीठाचे कार्यकारी संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील यांनी केले.
श्री. व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ सायन्स, पेठ येथे आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. महेश जोशी, प्राचार्य डॉ. एस. आर. माने, प्राचार्य डॉ. समीर नदाफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा. पाटील पुढे म्हणाले की, चीनसारख्या देशांमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सातत्याने काम सुरू असते. तेथील संशोधन संस्थाही संशोधनाच्या कार्यात सातत्य राखतात. बौद्धिक संपदा, संशोधन आणि नवनिर्मितीच्या जोरावर अनेक देश प्रगती करत आहेत. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील संशोधन आणि नवकल्पनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ‘पॅशन’चा पाठपुरावा करून त्यातून देशासाठी उपयुक्त कार्य घडवून आणावे.
कार्यकारी संचालक डॉ. महेश जोशी म्हणाले की, सध्या एखाद्या विषयावर संशोधन करण्याचे नियोजन करत असतानाच त्यासंदर्भातील संशोधन किंवा तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध झालेले दिसते. त्यामुळे काही वेळा नियोजित संशोधन कालबाह्य होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांकडे नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट संकल्पना आहेत; मात्र त्या संकल्पनांना योग्य दिशा देण्यासाठी योग्य वेळी सक्षम मार्गदर्शक मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. समीर नदाफ यांनी राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. शिल्पा भोसले यांनी करून दिली. आभार प्रदर्शन प्रा. योगिता कदम व प्रा. अमृता कांबळे यांनी केले, परिषद यशस्वी होण्यासाठी प्रा.पुजा साळूंखे, प्रा.तेजश्री मोरे,प्रा.प्रिती मुळीक,प्रा.शुभांगी पाटील,प्रा राजस्वी पाटील व श्री विवेक सुपने यांनी सहकार्य केले.
या परिषदेसाठी परीक्षक म्हणून डॉ. साक्षी जेठली, डॉ. तानाजी भोसले, डॉ. सचिन कांबळे आणि प्रा. सारंग कदम यांनी काम पाहिले.
या राष्ट्रीय परिषदेसाठी विविध महाविद्यालयातून २००हून अधिक विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमधील विविध विभागातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.











