गांधीनगर/प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांमधील १२ रिक्त पदांवर १२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अखेर करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भिमराव आनंदा गोंधळी, जिल्हा महासचिव सागर कुरडे, शहर अध्यक्ष प्रवीण आजवेकर, करवीर महासचिव अर्जुन कांबळे, विनोद कांबळे, करवीर संघटक शिवाजी कांबळे, कोषाध्यक्ष संदीप गोंधळी आणि महिला आघाडी अध्यक्षा रसिका चौगुले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
श्री. गोंधळी यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे निवेदन सादर करून उर्दू माध्यम शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. अशोक घुगे यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय समायोजन प्रक्रिया पूर्ण करून आदेश निर्गमित केले.
संचमान्यता सन २०२५-२६ नुसार जिल्हास्तरावर अतिरिक्त ठरलेल्या २ अध्यापक व १० विषय शिक्षक अशा एकूण १२ शिक्षकांचे समायोजन उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांवर करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार.”











