

एकसंबा (ता.चिकोडी) येथील एकसंबा शहरात १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. (मल्टी-स्टेट) यांच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या भव्य उद्घाटन समारंभ व बृहद सभेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या परिसरात जय्यत तयारी सुरू झाली आहे.
देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री.अमित शहा जी तसेच केंद्रीय मंत्री आणि विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था व आयोजनाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने काल कार्यक्रमस्थळाला भेट दिली. आय.जी.पी. श्री. संदीप पाटील, डी.वाय.एस.पी. श्री. गोपाळगौडर आणि सी.पी.आय. श्री. विश्वनाथ चौगला यांनी बिरेश्वर संस्थेच्या परिसराची पाहणी केली.
यावेळी अधिकाऱ्यांनी प्रमुख व्यासपीठ, नवीन प्रशासकीय कार्यालय तसेच कार्यक्रमाच्या परिसराची सविस्तर पाहणी करून सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि कार्यक्रमाच्या एकूण आराखड्याबाबत संबंधितांशी चर्चा केली. मोठ्या संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
बिरेश्वर संस्थेच्या आवारात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आगमन होताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अत्यंत आदराने व आत्मीयतेने स्वागत केले. या भव्य कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने विविध स्तरांवर नियोजन करण्यात येत असून, उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीत व्यस्त आहेत.
१९ सप्टेंबरच्या या कार्यक्रमामुळे एकसंबा शहराला मोठ्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाचे व्यासपीठ मिळणार असून, या ऐतिहासिक सोहळ्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.











