संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी
चंदगड : जन्माष्टमीनिमित्त उत्सवाचे औचित्य साधून चंदगड येथे शुक्रवारी दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या दहीहंडी उत्सवांपैकी एक म्हणून या सोहळ्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या दहीहंडी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची विक्रमी बक्षीस रक्कम असणार आहे. महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेनेचे अध्यक्ष प्रशांत अणगुडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, दहीहंडी फोडण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, तसेच खा. शाहू महाराज आणि आ. शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे दहीहंडी सोहळ्यासोबतच गुणवंतांचा सन्मान हा कार्यक्रमाचा विशेष भाग ठरणार आहे.
चंदगड शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मैदानावर आकर्षक विद्युत रोषणाई, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक नियोजन करण्यात येत असून, उद्याच्या दहीहंडी सोहळ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.











