
सदलगा प्रतिनिधी – अनिलकुमार डेक्कनावर, सदलगा येथील केंद्रीय विद्यालय, शासकीय पॉलिटेक्निक आणि आयटीआय प्रशिक्षण केंद्र शहरापासून 3-4 किमी अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना अडचण होत होती. याची दखल घेऊन आ. गणेश हुक्केरी यांच्या सूचनेनुसार बस महामंडळाचे अध्यक्ष पिरगोंडा पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते राजू अमृतसमानावर यांनी प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावला व बस सेवा सुरू केली.
विभागीय वाहतूक नियंत्रक एम. आर. मुंजी यांना निवेदन देऊन 10 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. पण त्यापूर्वीच विभागीय वाहतूक अधिकारी ए. आर. छब्बी, आगार व्यवस्थापक एन. एम. केरी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक आप्पासाब संकेश्वर यांनी सदलगा येथे भेट देऊन पिरगोंडा पाटील यांच्यासोबत बससेवेचा मार्ग निश्चित केला.
10 सप्टेंबरपासून सदलगा बसस्थानकातून तिन्ही शिक्षण संस्थांपर्यंत वेळापत्रकानुसार बस सुरू होणार असून त्यामुळे आंदोलन मागे घेतल्याचे पिरगोंडा पाटील यांनी सांगितले.











