Edition

चंबुखडी टाकीतून निघतोय गांजाचा धूर, ‘राणी पद्माराजे’ टाकीच्या परिसरातील शिंगणापूर ‘रॉ वॉटर’ टाकीवर मध्यरात्री चालते गांजा पार्टी, पोलिसांकडून कार्यवाही ची गरज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती वृत्तसेवा विवेक पाटील,

शिंगणापूर, ता. ६ : कोल्हापूर महानगरपालिका ‘प्रभाग क्रमांक – ८’ लक्षतीर्थ वसाहत हद्दीत येणाऱ्या शिंगणापूर मार्गावरील ‘राजगोल पाणंद’ परिसरात असलेल्या ‘राणी पद्माराजे छत्रपती, चंबुखडी’ पाण्याच्या टाकीच्या पिछाडीस असलेल्या शिंगणापूर योजनेच्या ‘रॉ वॉटर’ टाकीवर गेली २ – ३ वर्षे मध्यरात्रीच्या सुमारास ‘गांजा पार्टी’ सुरू असून, मद्यधुंद तरुण मादक पदार्थांचे सेवन करून टाकीवर धिंगाणा घालत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निम्म्या कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या ‘राणी पद्माराजे छत्रपती पाण्याच्या टाकीच्या’ परिक्षेत्रातील शिंगणापूर योजनेच्या ‘रॉ वॉटर’ टाकीवर ‘मध्यरात्री एक – पहाटे चार’ च्या सुमारास काही अज्ञात तरुण टाकीवर चढून गांजा, ड्रग्ज, एमडी चे सेवन करत असल्याचे चित्र चंबुखडी परिसरात निदर्शनास आढळून आले आहे. याची शहानिशा करण्यासाठी ‘सकाळ प्रतिनिधी’ ने घटनास्थळी जावून परिसराची पाहणी केली असता तेथील टाकीवर मद्याच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेट्स ची पाकिटे, गुटखा तसेच ‘गांजा ओढण्यासाठी खास तयार करण्यात आलेली’ बाटली आढळून आली. याबाबत ‘राणी पद्माराजे टाकी, चंबुखडीवर पाणी सोडण्यासाठी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची अधिक माहिती विचारली असता त्यांच्याकडून रात्रीच्या वेळेस काही तरुण टाकीवर मोठा जाळ करून, मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याचे समजले. गेली काही वर्षे हिच परिस्थिती कायम असल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यातील काही तरुणांकडे धारधार शस्त्रे असल्याने या भागातील नागरीक पोलिसांना तक्रार देण्यास धजावत आहेत. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांतून होत आहे.

 

प्रतिक्रिया

अशा घटनांची सखोल माहिती घेण्यासाठी ‘विशेष पथके’ बनवून संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी आदेश देत आहे.

– श्रीराम कान्हेरकर, पोलीस निरीक्षक, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे.

 

गांजा, एमडी, ड्रग्ज चे सेवन केल्याने तरुण पिढ्या नासत आहेत. अशा तरुणांना ताब्यात घेवून पर जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणात क्वारंटाईन करून जिथे फक्त शुद्ध पाणी, फळे मिळतील अशा ठिकाणी उपचार करावे.

– प्रकाश सरनाईक, सामाजिक कार्यकर्ते

 

ऐतिहासिक ‘राणी पद्माराजे’ छत्रपती, चंबुखडी पाण्याच्या टाकीच्या आवारातील अशा घटना या कोल्हापूर च्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या आहेत. पोलीस प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे.

– शिवतेज खराडे, महानगरपालिका प्रभाग क्रमांक – आठ

 

‘लक्षतीर्थ वसाहत’ मध्ये हफ्ते घेऊन सुरू असलेली ‘अवैध दारू’ विक्री एल. सी. बी यांनी त्वरित बंद करावी अन्यथा संबंधीत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल.

– प्रशांत उर्फ भैय्या खेडकर, नगरसेवक, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष.

 

शिंगणापूर : १) चंबुखडी येथील ‘राणी पद्माराजे छत्रपती’ पाण्याच्या टाकीच्या आवारातील शिंगणापूर ‘रॉ वॉटर’ टाकीवरील गांजा ओढण्यासाठी खास बनविण्यात आलेली बाटली.

२) शिंगणापूर ‘रॉ वॉटर’ टाकीवर अज्ञातांकडून मद्याचे सेवन केल्यानंतर पडलेल्या रिकाम्या बाटल्या.

३) महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ‘राणी पद्माराजे छत्रपती’ पाण्याची टाकी, चंबुखडीच्या गर्द झाडीत असलेली शिंगणापूर योजनेची ‘रॉ वॉटर’ टाकी.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!