कोल्हापूर प्रतिनिधी – कबनूर येथील सरंजामी (जागीर) जमिनींना वर्ग-१ दर्जा देणे, तसेच रेंदाळ व इचलकरंजी येथील विविध प्रलंबित महसुली प्रश्नांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात माझ्या व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी कबनूर गावातील सरंजामी जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर अद्याप वर्ग-२ अशी नोंद असल्यामुळे शेतकरी व जमीनधारकांना महसुली, प्रशासकीय तसेच कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. कायद्याच्या तरतुदीनुसार पात्र जमिनींची आवश्यक तपासणी करून त्यांना वर्ग-१ मध्ये वर्गीकृत करण्याबाबत तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच रेंदाळ येथील भूखंडधारकांना अनेक वर्षांपूर्वी भूखंडांचे वाटप झाले असले तरी त्यांच्या नावांची सातबारा उताऱ्यावर नोंद झालेली नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. जुने कब्जे हक्क व संबंधित कागदपत्रांची तपासणी करून पात्र भूखंडधारकांची सातबारा नोंद करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
याशिवाय इचलकरंजी येथील रुंद विकास योजनेसाठी भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न देखील बैठकीत मांडण्यात आला. संबंधित बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार देय मोबदला मिळावा, तसेच प्रलंबित रक्कम तातडीने अदा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शेतकरी, जमीनधारक व भूखंडधारकांच्या प्रलंबित महसुली प्रश्नांना गती देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तातडीने कार्यवाही करावी, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी इचलकरंजीचे प्रांतअधिकारी महसूल, भूमी अभिलेख व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.











