Edition

गणित विषय सोपा करून विद्यार्थ्यांच्या मनात घर करणारे अजित अण्णाप्पा धुळासावंत सर बोरगाव परिसरातील विद्यार्थीप्रिय शिक्षक व कुशल प्रशासक म्हणून अजित सरांची उल्लेखनीय कारकीर्द.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा प्रतिनिधी – बोरगाव व परिसरातील विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लावून, आपल्या प्रेमळ व प्रभावी अध्यापनातून अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला योग्य दिशा देणारे अजित अण्णाप्पा धुळासावंत सर यांची शिक्षक म्हणून प्रदीर्घ व उल्लेखनीय कारकीर्द राहिली आहे. गणित हा अवघड वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहज व सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.

अजित अण्णाप्पा धुळासावंत सर यांचा जन्म २२ जुलै १९६६ रोजी कोथळी, ता. चिकोडी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोथळी येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण बेलद बागेवाडी येथे पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण जी.आय. बागेवाडी कॉलेज, निपाणी येथे झाले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९० ते १९९६ या कालावधीत चिकोडी व बागेवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गणित शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर १९९६ पासून २०२६ पर्यंत के. एस. पाटील हायस्कूल या अनुदानित शाळेत गणित शिक्षक म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ कार्य केले.
आपल्या तब्बल ३० वर्षांच्या सेवाकाळात २२ वर्षे सहाय्यक शिक्षक आणि ८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देतानाच मुख्याध्यापक म्हणून शाळेतील शिस्त, प्रशासन, सामाजिक संस्कार आणि विविध शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी विशेष महत्त्व दिले.

दहावीच्या बोर्ड परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे गणित विषयातील त्यांचे अध्यापनकौशल्य व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची पद्धत विशेष कौतुकास्पद ठरली आहे.

सरांच्या मुख्याध्यापकपदाच्या कार्यकाळात हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल अत्यंत उत्तम लागला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले. त्यांच्या हातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.

अजित धुळासावंत सरांचे वैशिष्ट्य म्हणजे बोलण्यातील मृदुता आणि प्रशासनातील कठोर शिस्त यांचा सुंदर समन्वय. विद्यार्थ्यांशी प्रेमाने व आपुलकीने संवाद साधत असतानाच शाळेतील शिस्तीबाबत ते नेहमीच काटेकोर राहिले. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित झाले.

अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सामाजिक बांधिलकी, चांगले संस्कार आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम व कार्यक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.

गणित विषयातील क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजतील अशा पद्धतीने शिकवणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेणे आणि त्याला प्रोत्साहन देणे ही त्यांच्या अध्यापनाची खासियत राहिली आहे. त्यामुळे “गणित विषय सोपा करून सांगणारे प्रेमळ शिक्षक” अशी त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.

शिक्षक म्हणून तब्बल तीन दशके ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या अजित अण्णाप्पा धुळासावंत सरांनी अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडवले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून घडलेली विद्यार्थ्यांची पिढी, मिळवलेले शैक्षणिक यश आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेले प्रेम व आदर हेच त्यांच्या कार्याचे खरे फलित आहे.

विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अनिलकुमार डेकनावर सदलगा.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!