
मुंबई प्रतिनिधी,
मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमधील दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांमध्ये होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. या धडक मोहिमेदरम्यान हजारो बेकायदेशीर प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करत रेल्वे प्रशासनाने ५७ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. भाजप पदाधिकारी श्री. वैजिनाथ औदुंबर धेडे (कातेवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याची व तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.
२० लोकल गाड्यांमध्ये आरपीएफ जवान तैनात
गर्दीच्या वेळी (Peak Hours) दिव्यांगांच्या डब्यांमध्ये सामान्य प्रवाशांची होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आणि दिव्यांगांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी दररोज २० लोकल गाड्यांमधील राखीव डब्यांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, मुंबई विभागातील सर्व प्रमुख स्थानकांवर आरपीएफ कर्मचाऱ्यांना विशेष दक्षता बाळगून बेकायदेशीर प्रवाशांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
जानेवारी ते जुलै २०२६ दरम्यान झालेली मोठी कारवाई:
रेल्वे कायदा कलम १५५ (१) अंतर्गत: ५,१३८ सामान्य प्रवाशांवर कारवाई करून त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांच्याकडून ₹९,४९,७००/- चा दंड वसूल करण्यात आला.
सार्वजनिक विश्वास कायदा २०२६ (Jan Vishwas Act 2026) अंतर्गत: २,४२८ सामान्य प्रवाशांकडून ₹४८,४६,४०१/- इतका दंड पेनल्टी म्हणून वसूल करण्यात आला आहे.
तक्रारीची दखल आणि रेल्वे प्रशासनाचे आश्वासन
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला आणि दादर यांसारख्या गर्दीच्या स्थानकांवर दिव्यांगांना डब्यात चढणे व उतरणे अशक्य होते, तसेच अनेकदा वाद व मारहाणीचे प्रकार घडतात, याकडे वैजिनाथ धेडे यांनी ई-मेल व निवेदनाद्वारे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांचे (Sr. DSC) लक्ष वेधले होते. यावर सहाय्यक सुरक्षा आयुक्त विद्याधर बारीक यांनी पत्राद्वारे आश्वस्त केले आहे की, आरपीएफ कडून ही देखरेख आणि कडक कारवाई निरंतर सुरू राहील. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किंवा घुसखोरी आढळल्यास दिव्यांगांनी तात्काळ जवळच्या आरपीएफ चौकीशी संपर्क साधावा.
मुंबईकरांच्या वतीने वैजिनाथ धेडे यांचा नागरी सत्कार व आभार प्रदर्शन सोहळा!
रेल्वे प्रशासनाला कडक कारवाई करण्यास भाग पाडून मुंबईतील हजारो दिव्यांग बांधवांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित आणि सुखकर केल्याबद्दल, विविध दिव्यांग संघटना, सामाजिक संस्था आणि मुंबईकर नागरिकांच्या वतीने श्री. वैजिनाथ औदुंबर धेडे यांचा विशेष कौतुक, नागरी सत्कार आणि आभार प्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास मुंबई व सोलापूर परिसरातील नागरिक, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.











